गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू होत आहे. त्यामुळेच रेल्वेगाड्या, बसेसमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. बहीण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. यासाठी ते रेल्वेचे आरक्षण करीत आहेत. राखी पौर्णिमेमुळे रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत असल्याचे चित्र आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज दीड हजारावर तिकिटांचे आरक्षण केले जात आहे. मुंबई आणि हावडा या दोन्ही मार्गांवरील गाड्यांमध्ये रेल्वे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले असून, आताच शंभर ते दीडेशवर वेटिंग असल्याने आरक्षण करण्यासाठी गेलेल्यांना गेल्या पावलीच परतावे लागत आहे, तर नियमित सुरू असलेल्या गाड्यांमध्येसुद्धा गर्दी वाढली असून, येथील रेल्वे स्थानकावरून दररोज सहा हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत.
...............
६० टक्के वाढले प्रवासी
- कोरोनाच्या संसर्गामुळे काही विशेष गाड्याच सुरू होत्या. या गाड्यांचे तिकिटाचे दरसुद्धा अधिक होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी नव्हती.
- रेल्वे विभागाने एक्स्प्रेस काही पँसेजर गाड्यासुद्धा सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे.
- निर्बंध शिथिल करण्यापूर्वी दोन ते अडीच प्रवासी दररोज ये-जा करीत होते, तर आता सहा हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करीत आहेत.
- रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- लोकल आणि पँसेजर गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
..............
या गाड्यांमध्ये सर्वाधिक वेटिंग
मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस - १५० वेटिंग
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस -१७० वेटिंग
हावडा-मुंबई मेल - २१० वेटिंग
समता एक्स्प्रेस : ११० वेटिंग
छत्तीसगड एक्स्प्रेस : ७८ वेटिंग