अनेकदा निविदा प्रक्रिया : मात्र टेंडर भरण्यात अनुत्सुकगोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेने चार-पाच वर्षापूर्वी व्यापारी मॉल (मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स) बांधला. परंतु तांत्रिक अडचणीत तो अद्याप सुरू झाला नाही. त्याची देखभाल नसल्यामुळे ग्रीन शेडेत छत तुटले असून तो उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.रेल्वे स्थानक परिसरात तयार करण्यात आलेला मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स अनेक वर्षांपासून बंद आहे. अनेकदा निविदा काढण्यात आली होती, परंतु कुणीही टेंडर भरण्यात रूची दाखविली नाही. आता पुन्हा सहा महिन्यापूर्वी नवीन निविदा काढण्यात आली होती. परंतु अद्यापही त्यात कुणीही रूची दाखविली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चून तयार करण्यात आलेला सदर मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स बेवारस स्थितीत पडून आहे. तो कधी सुरू होईल याबाबत ठामपणे रेल्वेचे कोणतेही अधिकारी काहीही सांगत नाही.काही महिन्यांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकात आलेले दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कंसल यांनी त्यावेळी एक पत्र परिषद घेवून सांगितले होते की, गोंदियाला आदर्श रेल्वे स्थानक बनविण्यात येत आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. आदर्श रेल्वे स्थानक बनल्यानंतर अधिक सोयी-सुविधा गोंदियाच्या नागरिकांना उपलब्ध होतील. यासाठी मंजुरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने एक प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे. मात्र पाच वर्षापूर्वी तयार झालेल्या या मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्सबाबत ते ठामपणे काहीही बोलले नव्हते. त्यामुळे सदर कॉम्प्लेक्स कधी सुरू होणार, हे गुलदस्त्यातच आहे.सदर मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी संबंधित प्रशासनाने लाखो रूपयांचा खर्च केला. उद्घाटन होणे अद्याप रखडले आहे. मात्र आता या कॉम्प्लेक्सचे वरील छत ठिकठिकाणातून तुटले आहे. पावसाचे पाणी त्यात शिरत आहे. समोरून सुंदर काचेच्या दिसणाऱ्या या कॉम्प्लेक्सच्या वर छताकडे नजर टाकल्यास या बेवारस ठरलेल्या कॉम्प्लेक्सचे किती नुकसान झाले आहे, ते लक्षात येते. रेल्वे प्रशासन एक काम सुरू करते, मग ते काम बंद करण्यासाठी निधी खर्च करते, कालांतराने पुन्हा तेच काम सुरू करते. या प्रकारामुळे शासनाच्या निधीची वाट लागत आहे. (प्रतिनिधी)७७.७४ लाखांचा खर्चगोंदिया रेल्वे स्थानक परिसरात सन २०१२ मध्ये मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्सचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यात १२ दुकानांसाठी खोल्या काढण्यात आल्या. सदर कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी ७७ लाख ७४ हजार रूपये खर्च करण्यात आले. एवढी मोठी रक्कम खर्चूनही हे मॉल बंदच असल्यामुळे हा निधी व्यर्थ तर जाणार नाही? असा सवाल गोंदियावासियांना पडत आहे. मात्र निविदा काढल्यावरही तेथील शॉप घेण्यासाठी कुणीही उत्सुकता दाखवत का नाही? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.परिसरात दारूचे पव्वेसदर मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्सच्या मागील परिसरात आता केरकचरा घातला जात आहे. त्या कचऱ्यामध्ये देशी-विदेशी दारूचे पव्वेसुद्धा आढळून येतात. कदाचित असामाजिक तत्वांचा रात्रीला या परिसरात संचार असावा, अशी दाट शक्यता बळावली आहे.
रेल्वेचा मल्टीफंक्शनल मॉल उद्घाटनापूर्वीच होतोय उद्ध्वस्त
By admin | Published: June 29, 2016 1:42 AM