गोंदिया : हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यंदा पावसाने सुरुवातीपासून विश्रांती घेत अनियमिततेची चाहूल दिली आहे. त्यामुळे रोवणीची कामे खाेळंबण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी रोवणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात १ ते २७ जून या कालावधीत १९२.८ मिमी पाऊस पडतो. तर यंदा याच कालावधीत जिल्ह्यात २०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १,३२० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत सरासरीच्या १६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे १ लाख ८९ हेक्टर क्षेत्र आहे. पऱ्हे टाकण्याचे काम आटोपले असून आता शेतकऱ्यांना रोवणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सलग असा दमदार पाऊस झाला नसल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. रोवणीच्या कामाला वेग येण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.