गोंदिया : मागील आठवड्याभरापासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारच्या रात्री परतून आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी सुद्धा सुखावल्याचे दिसून येत आहे. दिवस कडक उन्हात निघाल्यानंतर रात्री अचानकच पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात ५०.४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून यात सालेकसा तालुक्यात सर्वाधीक २६.२ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. २० जून रोजी छप्पर फाडके बरसलेल्या पावसाने चांगलीच दडी मारली होती. यंदाच्या पावसाळ््यातील खरा पाऊस शुक्रवारीच बरसल्याचे चित्र असून तशी नोंदही आहे. यास आठवडा होत असून त्यानंतर पावसाने मात्र दडी मारली. त्यामुळे पाऊस बरसणार कधी याची प्रत्येकच वाट बघत होता. पाऊस दडी मारून बसल्याने उष्णतेची लाट परतून आली होती. कडक उन्हामुळे उन्हाळा पुन्हा सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. अशात दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. तर या पावसाची दिवसाही रिप-रिप सुरूच होती. अचानकच आलेल्या या पावसाने मात्र वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला व त्यामुळे नागरीक सुखावले. जिल्ह्यात बरसलेल्या या पावसाची आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यात ३.८ मिमी., गोरेगाव व तिरोडा निरंक, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २.८ मिमी., देवरी तालुक्यात ६ मिमी., आमगाव तालुक्यात ५.४ मिमी., सडक अर्जुनी तालुक्यात ६.२ मिमी. तर सालेकसा तालुक्यात २६.२ मिमी. अशी एकूण ५०.४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर शनिवारच्या या पावसाला धरून आतापर्यंत ७८६.८ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. (शहर प्रतिनिधी)
पाऊस परतला, रिमझीम सुरू
By admin | Published: June 28, 2014 11:37 PM