लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील आठवड्यात जिल्ह्यात थंडीने चांगलाच कहर केला होता व किमान तापमान थेट ७.२ अंशांपर्यंत आले होते. मात्र, आता जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पावसाळा सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे. यामुळे मात्र पारा वरवर चढत असून, मंगळवारी (दि. २४) किमान तापमान १५.३ अंशांवर पोहोचले होते. अशातच आता हवामान खात्याने २७ व २८ तारखेला पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
यंदा उन्हाळा व पावसाळा आपल्याच तालात राहिला व त्यांना समजून घेता आले नाही. जून महिन्यापर्यंत उन्हाळ्याने घाम फोडला, तर दिवाळीपर्यंत पावसाचा लहरीपणा जाणवला. अशात आता हिवाळाही दररोज आपले रंग बदलताना दिसत आहे. यंदा दिवाळी आटोपल्यानंतर थंडीने थोडाफार जोर दाखविला. तर मागील आठवड्यात थंडीने चांगलाच कहर केला होता. जिल्ह्याचे किमान तापमान तब्बल ७.२ अंशांपर्यंत पडले होते. थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. तर त्यानंतर आता ढग दाटून आले आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे आता थंडी गायब झाली असून, तापमान १५.३ अंशांवर पोहोचले आहे.
हवामान बघून नियोजन करामागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, हीच स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अशातच हवामान खात्याने २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अशात शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.