तीन दिवसांपासून हजेरी : उकाड्यापासून मिळाला दिलासा लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्र लागताच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून सतत बरसत असलेल्या पावसाने सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाची झमाझम सुरू असल्याने सर्वच खुश असून जिल्ह्यात आतापर्यंत ४२५.७ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची १२. ८ एवढी सरासरी आहे. यंदा उन्हाने चांगलेच भाजून सोडले. विशेष म्हणजे नवतपा जेवढा तापला नाही तेवढा उकाडा नवतपा नंतरच्या काही दिवसांत अनुभवायला मिळाला. दरम्यान ७ जून पासून मान्सून सुरू झाला व ९ जून पासून जिल्ह्यात वरूणराजाने आपली हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यात वातावरण आता उकाड्यापासून मुक्त झाले असून तापमानात घसरण आली आहे. दिवसा उन्ह तर दुपारपासून अचानकच ढगाळ वातावरणासह पाऊस हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारपासून (दि.९) बरसत असलेल्या या पावसाने जिल्हावासी खुश असून शेतकरीही सुखावला आहे. शनिवारी (दि.१०) पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यात २९८.४ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली. तर आता दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने उकाडा कमी झाला असून नागरिक दिवसाही घराबाहेर पडू लागल्याचे दिसत आहे. पाऊस बरसण्यापूर्वी ४० डिग्रीच्या गेलेले तापमान आता ३८ डिग्रीवर आले आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि.१०) गोंदिया तालुक्यात ४७.१ मीमी., गोरेगाव तालुक्यात ६१.२ मीमी., तिरोडा तालुक्यात १४.८ मीमी., देवरी तालुक्यात १५.० मीमी., आमगाव तालुक्यात ६९.८ मीमी., सालेकसा तालुक्यात १६.७ मीमी., सडक-अर्जुनी तालुक्यात ५३.८ मीमी. अशी एकूण २९८.४ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून याची ९.० एवढी सरासरी आहे. फक्त अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पाऊस बरसला नसल्याचे दिसले.
जिल्ह्यात पावसाची झमाझम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 1:27 AM