गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचा मुख्य कालावधीत निघून जात असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने पर्जन्यमानात गोंदिया जिल्ह्याचा रेडझाेनमध्ये समावेश झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास खरिप पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विदर्भात दमदार पाऊस पडत असला तरी, अनेक जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विदर्भातील अकरापैकी तब्बल सात जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही तर चार जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न आल्यास खरिपासोबतच रब्बी पिकांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आतापर्यंत वरुणराजाने निराशाच केली आहे. जिल्ह्यात १ जून ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत २ सप्टेंबरपर्यंत ८०६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ६६.११ टक्के आहे. १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसापेक्षा आतापर्यंत २५ टक्के पाऊस कमी पडला आहे तर या महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती हे चार जिल्हे सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने रेडझोनमध्ये गेले आहे.
..................
१ लाख ८१ हजार हेक्टरमधील पिकांवर संकट
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरिप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाला भरपूर पाणी लागते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने धानपीक संकटात आले आहे. पावसाअभावी उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर पावसाने पुन्हा ओढ दिल्यास २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
............
सिंचन प्रकल्पात अपुरा साठा
सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली तरी यंदा अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. मोठ्या सिंचन प्रकल्पात ३५ टक्के तर मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा आहे तर काही धरणांमध्ये राखीव पाणीसाठ्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...............