लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन पोलीस पाटलाचे सेवानिवृत्तीचे वय ६५ करावे व सेवानिवृत्त पोलीस पाटलांसाठी सेवानिवृत्तीची योजना सुरू करण्याची मागणी केली. पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांना ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्याची मागणी केली. सेवानिवृत्त पोलीस पाटलांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीची योजना सुरू करावी, अशी मागणी केली. कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसानांना विम्याची ५० लक्ष रुपये लवकरात लवकर देण्यात यावे. यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी शासनस्तरावर याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. ना. अमित देशमुख यांना सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा वृद्ध कलावंत मानधन योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी केली. पोलीस पाटील गाव पातळीवर शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असून तो पीडित लोकांना मार्गदर्शन करतो. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा निमंत्रक म्हणून गावातील तंटे गावातच मिटविण्यात मदत करतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक म्हणून सेवानिवृत्त पोलीस पाटलांना मदत करावी, अशी मागणी केली. ना. अमित देशमुख यांनी याची दखल घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आ. मनोहर चंद्रिकापुरे, भृृंगराज परशुरामकर, जब्बारभाई पठाण व आर.बी. वाढई उपस्थित होते.