देवरी : सन १८८४ ते १९२२ च्या ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. राजश्री शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक होते, असे प्रतिपादन आ. सहषराम कोरोटे यांनी केले.
देवरी येथे कोरोटे भवनात शनिवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सर्वप्रथम राजश्री शाहू महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, प्रशांत कोटांगले, अविनाश टेंभरे, भुवन नरवरे, कैलास देशमुख, जैपाल प्रधान, शार्दुल संगीडवार, मनोज नंदेश्वर,आनंद येरणे, संजय कोरे उपस्थित होते.