लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनामुळे मागील २ वर्षे पडलेल्या खंडानंतर यंदा शहरात रामाचे नवरात्र मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. तर रविवारी (दि. १०) रामनवमनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराचे भ्रमण करीत निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांच्या ‘जय श्रीराम’ जयघोषाने शहर दणाणून गेले होते. शहरातील रामनगर परिसरातील राममंदिरातून सायंकाळी शोभायात्रा निघाली. रामनगर, रेलटोली, सिव्हील लाईन्स व बाजार परिसर होत निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाले होते. यामध्ये वयोवृद्धांपासून ते लहानग्यांसह तरुणी व महिलांनीही भाग घेतला होता. ढोलताशांच्या गजरात व डीजेवरील प्रभू रामचंद्रांच्या गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन नाचत गात श्रीरामाचा जयघोष करीत होती. मागील २ वर्षे कोरोनामुळे रामनवमी उत्सव साजरा करता आला नसून शोभायात्रा काढता आली नव्हती. मात्र यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्याने रामनवमी मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, शनिवारी (दि. ९) शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये हजारोंच्या संख्येत तरुण-तरुणी व युवक सहभागी झाले होते.
जागोजागी पेय व खाद्यपदार्थांचे वितरण - रामनगर मंदिरातून निघालेल्या या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येत रामभक्त सहभागी होत असल्याने त्यांच्यासाठी शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पेय व खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तेथून शोभायात्रेत सहभागी रामभक्तांना पेय व खाद्यपदार्थांचे वितरण केले जात होते. बजरंग दलने काढली शोभायात्रा - रामाच्या नवरात्रीनिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नेहरू चौक परिसरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना केली होती. रामनवमी दिनी त्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सहभाग घेण्यात आला होता.
भगव्या तोरण व पताकांनी सजविले शहर- गुढीपाडवापासून रामाच्या नवरात्रींना सुरुवात झाली असून, तेव्हापासून शहर भगव्या तोरण व पताकांनी सजविण्यात आले होते. विशेष म्हणजे, दोन वर्षांनंतर रामनवमीला शोभायात्रा निघणार असल्याने भाविकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. शहरातील प्रत्येकच भागात भगव्या पताका व तोरण लावण्यात आलेले दिसले. घराघरांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. यासाठी कार्यकर्ते रात्री मेहनत घेताना दिसले. साई मंदिरात रामजन्मोत्सवाचे आयोजन - शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील साई मंदिरात रामजन्मोत्सवाचे आयोजन केले जात असून, रविवारी (दि. १०) बाबांची पालखी यात्रा काढण्यात आली. साई मंदिरातून निघालेली यात्रा सिव्हील लाईन्स परिसर होत बाजार भागातून मनोहर चौक, गोविंदपूर, गजानन महाराज मंदिर होत निघते. या पालखी यात्रेत मोठ्या संख्येत भाविकांनी सहभाग घेतला. एकजूट दाखविणारी मोटारसायकल रॅली - रामनवमीनिमित्त येथील सर्व हिंदू समाज सेवा समितीच्यावतीने शनिवारी (दि. ९) मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रामनगर परिसरातील राम मंदिरातून निघालेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येत रामभक्तांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे, भर उन्हात निघालेल्या रॅलीत तरुणांसह महिला व तरुणीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.