राका (पळसगाव) येथील प्रकार : भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणीसौंदड : रक्ताचे पाणी करून शेतकरी आज शेती करीत आहेत. अशात मात्र ऐनवेळी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी झाल्यास कर्जबाजारी झालेला शेतकरी आणखीच कर्जाच्या खाईत जातो. अशीच काहीशी घटना येथील राका (पळसगाव) येथे घडली. रानडुकरांनी पिकांची नासाडी केल्याने येथील शेतकरी हतबल झाला असून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात धान हेच प्रमुख पीक असतानाच कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे आज शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. यातूनच मौजा राका (पळसगाव) येथील शेतकरी तुकाराम राघोबा उपरीकर यांनी आपल्या शेतामध्ये मका आणि मुुगाची लागवड केली होती. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पीकाची नासाडी केली. वन्यप्राण्यांच्या हैदोसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपन करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन विभाग शेतकऱ्याच्याच मानगुटीवर बसते. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून न घेता शासनाने वन्य प्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपरीकर यांनी केली आहे.(वार्ताहर)
रानडुकरांनी केली पिकांची नासाडी
By admin | Published: March 31, 2017 1:16 AM