जांभळी दोडके परिसरात एक रानगवा मृत्युमुखी पडल्याची माहिती बीट वनरक्षक माया घासले यांना गस्तीवर असताना मिळाली. महिती मिळताच मानद वनयजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सहायक वनसंरक्षक पंकज उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत देशमुख, क्षेत्र सहायक रमेश लांबट, वनरक्षक घासले यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करून रानगव्याची उत्तरीय तपासणी येथील पशुधन विकास अधिकारी श्रीकांत वाघाये पाटील यांनी केली. रानगवा २-३ दिवसांपूर्वी मरण पावल्याचे समजते. जांभळी-दोडके, डोंगरगाव-डेपो परिसरात वन्यप्राणी मरणार नाहीत, यासाठी वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या अभावाने प्राण्यांचा मृत्यू होतो, परंतु सध्या जंगलात पिण्याच्या पाण्याची सोय असतानाही वन्यप्राण्यांचा मृत्यू कसा होतो, हाही संशोधनाचा विषय आहे.
दोडके-जांभळी परिसरात रानगव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:27 AM