लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम चांगोटोला येथे दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो कोब्रो साप आढळून आला आहे. या सापाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.चांगोटोला येथील नरेंद्र पटले यांच्या शेतात मागील काही दिवसांपासून सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत एक साप दिसत आहे. हा साप पांढऱ्या रंगाचा असून सुमारे ६ इंच आकार व ६ फुट लांबीचा आहे. यामुळे या सापाला बघण्यासाठी दररोज नागरिकांची गर्दी होत आहे.वन परिक्षेत्र अधिकारी पी.एल.साठवणे यांना सापाबद्दल विचारले असता तो अल्बिनो कोब्रो नामक विषारी साप असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गोंदिया जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा दुर्मिळ साप आढळून आला असून बघ्यांची गर्दी वाढत आहे.विशेष म्हणजे, कुणालाही साप दिसल्यास त्याला ठार करा हा प्रकार जास्त चालतो. त्यात हा दुर्मिळ साप असल्याने त्यालाही नागरिकांपासून धोका आहे. सापाला कुणीही इजा करू नये किंवा मारू नये असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी साठवणे यांनी घटनास्थळावर जाऊन केले आहे.
चांगोटोलात आढळला दुर्मिळ अल्बिनो कोब्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 6:00 AM