गोंदिया : नवेगावबांध परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. पोषक वातावरण व मुबलक खाद्यापोटी नवेगावबांध व आजूबाजूचा परिसर विविध प्रजातींच्या पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. येथून जवळच असलेल्या सिरेगावबांध या तलावाच्या परिसरात ‘प्राच्य आर्ली‘ या पक्ष्याचे दर्शन झाले.
अर्जुनी मोरगाव परिसरातील विविध तलावांमधील स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या अद्यापही कमी झाली नाही. हा ‘प्राच्य आर्ली‘ असाच उन्हाळ्यात आपल्याकडे येणारा एक पक्षी आहे. आजपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्याला पाहिल्याची नोंद नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध जवळच्या परिसरातील बीड, भुरशी टोला, एरंडा तसेच सिरेगावबांधसारखे अनेक तलाव स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण आहे. सध्या सिरेगावबांध येथे इतर स्थलांतरित पाणपक्ष्यांसोबत प्राच्य आर्ली हा देखणा पक्षी बघावयास मिळत आहे. याचे इंग्रजी नाव (ओरियंटल पार्टनिकोल)असे आहे. याला ग्रास होप्पर बर्ड सुद्धा म्हणतात, कारण हा टोळ फार आवडीने फस्त करतो.
प्राच्य आर्ली पक्ष्याची वैशिष्ट्ये
या पक्ष्याची सरासरी लांबी २३ ते २४ सेंटीमीटर असते. शरीराच्या तुलनेत याचे पाय आकाराने लहान असतात. पंख लांब व टोकदार असतात. याच्या पंखांचा रंग गव्हाळ असून टोकावर काळी झालर असल्यासारखे दिसते. याची चोच लहान आकाराची असून टोकावर काळा रंग, वरील भागात चटक लालसर शेंद्री रंगाची असते. प्राच्य आर्ली हा पाणपक्षी आहे. साधारणतः पाणपक्षी जमिनीवर कीटकांची शिकार करतात. परंतु याची वैशिष्ट्यपूर्ण चोच असल्यामुळे हवेतच उडताना हे कीटकांची शिकार करतात. बहुधा सायंकाळच्या वेळी पाणी असलेल्या किनार भागात आपले भक्ष्य शोधताना, फिरताना दिसतात. यांचे प्रमुख खाद्य किडे, कृमी, गांडूळ, कोळी आणि विशेषतः टोळ आहे.
नवेगावबांध परिसरात अनेक छोटे मोठे तलाव आहेत. त्यातील जैवविविधता टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या तलावांवर दरवर्षी विविध प्रजातींचे पक्षी काही कालावधीसाठी येऊन राहतात. सिरेगावबांधच्या याच तलावावर २५ डिसेंबर २०२१ ला दुर्मिळ छोटा क्षत्र बलाक तसेच त्या आधी रंगीत करकोचा आढळून आला होता. तसेच बीडटोला, भूरसीटोला, भिवखिडकी येथील तलाव हे विविध प्रजातींच्या पक्ष्याचे आवडते ठिकाण आहेत. याच ठिकाणी प्राच्य आर्ली दिसणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
- प्रा.अजय राऊत, डॉ. शरद मेश्राम (निसर्ग प्रेमी, अर्जुनी मोरगाव)