अर्जुनी मोरगाव : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी समाजातील लोकांमध्ये मिसळून रचनात्मक कार्य करावे, समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करीत असताना त्याची सुरुवात स्वतःचे घर, शाळा, समाज यांपासून करावी व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रा. टी. एस. बिसेन, प्रा. यादव बुरडे उपस्थित होते. ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे, समाजाच्या गरजांची पूर्तता करणे जेणेकरून समाज सक्रिय बनेल, समाजातील साक्षर निरक्षर यांच्यातील दरी कमी होईल, रासेयो स्थापना उद्दिष्टे, त्याची माहिती सांगून २४ सप्टेंबर १९६९ या दिवशी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. डी. पठाण यांनी दिली. कार्यक्रमाठी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. जे. डी. पठाण यांनी केले.