लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेशनकार्डवर आतापर्यंत गहू, तांदूळ, तूरडाळ, साखर, तेल आदी दिले जात होते. पण आता ज्वारी आणि मक्याचे उत्पादनसुध्दा काही जिल्ह्यांमध्ये घेतले जात आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना मका आणि ज्वारीसुध्दा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गतवर्षीपासून गोंदिया जिल्ह्यात मका उत्पादन घेतले जात असून, स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांना चार ते पाच किलो मक्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, जून महिन्यापर्यंत तरी जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ आणि तूरडाळीचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने काही जिल्ह्यांत तेथे उत्पादीत होणाऱ्या ज्वारी आणि मक्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना सध्या तरी मका आणि ज्वारीचा पुरवठा केला जाणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार ४४७ रेशनकार्डधारक असून, यात प्राधान्य रेशनकार्डधारक १ लाख ४४ हजार ५२९, अंत्योदय रेशनकार्डधारक ७८,५१८ आणि पांढरे रेशनकार्डधारक ४,८४२ आहेत. या सर्व रेशनकार्डधारकांना ९९९ स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचा पुरवठा केला जातो.
........
सध्या काय मिळतेय
जिल्ह्यातील ९९९ स्वस्त धान्य दुकानांतून सध्या गहू, तांदळाचा पुरवठा केला जात आहे. नोव्हेंबर महिन्यापासून शासनाकडून तूरडाळीचा पुरवठा न करण्यात आल्याने तूरडाळीचे वितरण बंद आहे. तर काही रेशनकार्डधारकांना साखरसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली. जिल्ह्यात मक्याचे उत्पादन झाल्यास रेशनकार्डधारकांना मका उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
.....
कोट :
सध्या रेशनकार्डवर आम्हाला गहू आणि तांदूळ मिळत आहे. गतवर्षी प्रतिकार्ड चार ते पाच किलो मकासुध्दा देण्यात आला होता. पण त्याचा दर्जा चांगला नव्हता, त्यामुळे तो घेतला नाही. नोव्हेंबर महिन्यापासून तूरडाळ उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. रॉकेल तर मिळतच नाही.
- अमोद बागडे, रेशनकार्डधारक.
.........
रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, साखर आणि तेलसुध्दा नियमित उपलब्ध करुन द्यावे. कोरोनामुळे रोजगार गेल्याने रेशनकार्डवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याची मदत होते. त्यामुळे शासनाने नियमित स्वस्त धान्याचा पुरवठा केल्यास मोठी मदत होईल.
- रामप्रसाद सोनुले, रेशनकार्डधारक.
........
अन्न व नागरी पुरवठा विभागाने काही जिल्ह्यांत रेशनकार्डधारकांना ज्वारी आणि मका उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ उपलब्ध करुन दिला जाईल.
- देवचंद वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.
.......
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक
२ लाख २३ हजार ४४७
अंत्योदय रेशनकार्डधारक
७८,५१८
प्राधान्य रेशनकार्डधारक
१ लाख ४४ हजार ५२९
एपीएल रेशनकार्डधारक शेतकरी
०००