विजेंद्र मेश्राम
खातिया (गोंदिया) : शासनाच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आनंदाचा शिधा राज्य शासनाच्या वतीने देण्यात येते. १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधात साखर, तेल, पोहे, रवा, मैदा, दाळ दिले जात आहे. पण, गोंदिया तालुक्यातील खातियासह २३ गावांतील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे या २३ गावांतील नागरिक दिवाळीत गोडधोड तयार करुन दिवाळी आनंदात साजरी करण्यास मुकणार आहेत.
शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याचे नियोजन महिनाभरापूर्वीच करण्यात आले होते. दिवाळीपूर्वी काही स्वस्त धान्य दुकानांना शिधा पोहोचविण्यात आला. तर काही ठिकाणी अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांत निराशेचे वातावरण आहे. गोंदिया तालुक्यातील २३ गावांतील नागरिक आनंदाचा शिधाला मुकले आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
कुठे मैदा तर कुठे पोहे कमी
आंनदाचा शिधा किटमध्ये कुठे मैदा तर कुठे पोहे मिळाले नाही. तर गोंदिया तालुक्यातील २३ गावांमध्ये आनंदाचा शिधाची किट पोहोचली नाही. पोहे व मैदा आला नाही. यासंदर्भात या किटचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना पुरवठा विभागाने कळविले होते. पण, यानंतरही त्यांनी पुरवठा केला नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
- एच.डी.नाईक, पुरवठा निरीक्षक, गोंदिया.
इंटरनेटचा बसतोय फटका
स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारक गेले असता त्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांना तासन् तास बसून राहावे लागत आहे. परिणामी इंटरनेट बंदचा सुध्दा शिधापत्रिकाधारकांना फटका बसत आहे.