गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होेते. तर या पावसाचा सर्वाधिक फटका कापणी केलेल्या धानाला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंते वातावरण आहे. जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. तर मागील आठ दिवसांपासून धानाची कापणी सुरू असून जवळपास ६ ते ७ हजार हेक्टरमधील धान कापणी करून शेतातील बांध्यामध्ये पडला आहे. अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने धान मोठ्या प्रमाणात पाखड होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे. कृषी विभागाने हवामान विभागाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना काही दिवस धानाची कापणी न करण्याचा सल्ला दिला. तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितले. मात्र सोमवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानाच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.
...........
नुकसानीचे पंचनाम करणे सुरू
कृषी विभागाने मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. ६६ हजार हेक्टरमधील धानापैकी जवळपास ७ हजार हेक्टरमधील धानाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
.............
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
यंदा रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली, तर शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तर मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
...........