गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून, ही बाब दिलासादायक असतानाच कोरोनामुक्त झालेल्या गोरेगाव व सालेकसा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने यातून धोका वाढत असल्याचेही नाकारता येणार नाही. राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने राज्य शासनाचे टेन्शन वाढले आहे. अशात आता जिल्ह्यातही कमी का असेना रुग्णसंख्या वाढत असल्याने सतर्कता बाळगणे अधिक गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात मागील कित्येक दिवसांपासून १०च्या आत रुग्ण निघत आहेत. ही आकडेवारी दिलासादायक असून, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवून देते. मात्र, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने नक्कीच धोका टळलेला नाही, याचे हे संकेत आहेत. मध्यंतरी सोमवारी जिल्ह्यातील गोरेगाव, सालेकसा, देवरी व सडक - अर्जुनी हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले होते. शिवाय आमगाव व अर्जुनी - मोरगाव तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद घेण्यात आली होती. यावरून आता हे तालुकेही कोरोनामुक्त होऊन अशाच प्रकारे अवघा जिल्हा कोरोनामुक्त होणार असे वाटत होते.
मात्र, मंगळवार व बुधवारी आकड्यांची चाल बदलली व कोरोनामुक्त झालेल्या गोरेगाव व सालेकसा तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. आता गोरेगाव तालुक्यात २, तर सालेकसा तालुक्यातही २ बाधित रुग्ण असल्याने कोरोनामुक्त झालेल्या या तालुक्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय दररोज रुग्ण संख्या वाढत असून, त्यात बुधवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, आता जिल्हावासियांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज दिसून येत आहे.
---------------------------
जिल्हावासियांनो मास्क वापरा
राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अशात आता मुख्यमंत्र्यांनी उद्रेक बघता निर्बंध लावण्याबाबत सांगितले आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे सांगायची गरज नाही. त्यामुळे कोरोनाला परतावून लावण्यासाठी उपाययोजनांचे पालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. याकरिता जिल्हावासियांनो आता गमतीत न घेता मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर करण्याची नितांत गरज आहे.