देवरी : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे त्यादृष्टीने कृषी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे असे सांगत आमदार सहषराम कोरोटे यांनी कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या फायलीतील योजना शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश दिले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आढावा बैठकीत उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, देवरी तालुका कृषी अधिकारी बी. जी. तोडसाम, आमगाव तालुका कृषी अधिकारी एस. एस. जाधव, सालेकसा तालुका कृषी अधिकारी ए. एल. दुधाने, देवरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सी. बी. सिंदराम, मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. कुंभारे, पी.डी. तईकर, कृषी पर्यवेक्षक पांडे, मनोहर जगदाळ उपस्थित होते. देवरी तालुक्यातील नियोजनाचे सादरीकरण जी. जी. तोडसाम, आमगाव तालुक्याच्या नियोजनाचे सादरीकरण जाधव तर सालेकसा तालुक्याच्या नियोजनाचे सादरीकरण ए. एल. दुधाने यांनी केले. आमदार कोरोटे यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर चर्चा करून नियोजनाबाबत सूचना व निर्देश दिले. बियाणे, खतांची उपलब्धता, त्यांचे योग्य नियोजन करणे, पीक प्रात्याक्षिके, कमी कालावधीचे वाण, रब्बी हंगाम क्षेत्रात वाढ करणे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे अशा विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला. संचालन कृषी पर्यवेक्षक शिवकुमार येडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार रजनीश पंचभाई यांनी मानले.