आमगाव : जिल्ह्यात सर्वाधिक गाजलेल्या पदमपूर येथील बनावट रजिस्ट्री प्रकरणानंतर भूखंड माफियांचे आणखी एक प्रकरण आमगावात उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून दुसरा मात्र सावधपणे पसार झाला आहे.तालुक्यातील किडंगीपार येथील भुखंडाच्या विक्री प्रकरणात ग्राहकांची झालेली फसवणूक भुखंडधारकानेच समोर केल्याने ग्राहकांचे कान उघडे पडले आहेत. किंडगीपार येथे अशोककुमार रामकिसन सिंघानिया यांनी पार्टनरशिपमध्ये ३.२० एकर कृषक जमीन खरेदी केली. या जमिनीला अकृषिक करुन शासन निर्णयाप्रमाणे भुखंडधारकाने शासनाकडे भुखंड अकृषक करुन सदर भुखंडावर शासकीय नियमावलीप्रमाणे राखीव जागा सोडण्यात आली. परंतु याच राखीव जागेचा बनावट सातबारा तयार करुन विक्री करण्यात आली. यात आरोपी अनिल दसाराम बिसेन (३९) यांनी सदर राखीव भुखंडाचे बनावट सातबारा तयार करुन त्याची विक्री घडवून आणली.शासन नियमाप्रमाणे अकृषक भूखंडावर गट क्रमांक ४७१३ यावर ५५ हेक्टर आर जमीन क्रीडांगण व रस्ते बांधकाम पूर्ण करण्याकरिता राखीव होती. परंतु आरोपींनी सदर भुखंडाच्या जागेचा सातबारा तयार करुन संगनमताने आरोपी डॉ. शशांक डोये यांना विक्री केली. याप्रकरणी फिर्यादी अशोककुमार सिंघानिया यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात आमगाव पोलिसांनी तपास करून सदर भुखंडाची माहिती बाहेर काढली. यात सदर भुखंड शासन नियमाप्रमाणे नागरिकांकरिता क्रीडांगण व रस्ते बांधकामाकरिता राखीव असल्याचे पुढे आले. आरोपींनी बनावट सातबारा तयार केल्याची सत्यता पुढे आली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपी अनिल बिसेन, डॉ.शशांक डोये रा.आमगाव यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ (३४) प्रमाणे गुन्हा नोंद केला. यात आरोपी बिसेन याला अटक करण्यात आली. तर आरोपी डॉ.डोयेंना अद्याप अटक नाही. आमगाव तालुक्यात भुखंड माफियांनी साखळी तयार करुन बनावटपणे अनेक भुखंडांची विक्री करून सामान्य नागरिकांची फसवणुक केली असल्याचे प्रकरण समोर आले आहेत. परंतु प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याने आजही त्यांची साखळी सामान्य नागरिकांना भुलथापा देत त्यांची फसवणूक करताना दिसत आहेत. भुखंड विक्री करताना ग्राहकांना भुखंडावर अनेक सुविधा उपलब्ध असून यामधील सेवा सुविधा लवकर पूर्ण करणार अशी दिशाभूल करीत भूखंड विक्री करून ग्राहकांना फसविल्या जाते. परंतु ही प्रकरणे आता ग्राहकांच्याच अंगलट येत आहे. त्यामुळे नाईलाजाने सुविधांअभावीच तिथे वास्तव्य करण्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
आमगावातील बनावट रजिस्ट्रीला फुटली वाचा
By admin | Published: April 10, 2015 1:29 AM