गोंदिया : वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडिंग पाठविण्याची सोय आता विद्युत वितरण कंपनीने करून दिली आहे.यासाठी दरमहा चार दिवसांची मुदत तसेच ग्राहकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंट करून वीज बिल भरणा करण्यात यावे यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोनामुळे अनेक भाग व सोसायटी प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रिडिंग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांना मीटर रिडिंग पाठविता येईल.
महावितरणकडून केंद्रीयकृत वीज बिल प्रणाली सुरु करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांचे वीज बिलावर नमूद आहे मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडिंगच्या निश्चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडिंग पाठविण्याची एसएमएसव्दारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मॅसेज मिळाल्यापासून चार दिवसापर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ॲप किंवा वेबसाईटव्दारे रिडिंग पाठविता येईल. ज्या ग्राहकांना वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडिंग अपलोड करायचे आहेत त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे. स्वतःहून मीटर रिडिंग घेण्याचे फायदे अनेक आहेत.
......
हे होणार फायदे
स्वतःच्या मीटरकडे व रिडिंगकडे लक्ष राहील. वीज वापरावर नियंत्रण राहील. रिडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीज बिलाबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाही, रिडिंग अचानक वाढल्याची कारणे शोधता येईल, शंका समाधानासाठी तक्रार करता येईल या व इतर विविध फायद्यामुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडिंग पाठवावे.
बॉक्स
समस्या आल्यास असे करा
महावितरण मोबाईल ॲपमध्ये सबमिट मीटर रिडिंगवर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडिंग पाठवायचे आहे. तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडिंग घेताना वीज मीटरचा स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व (kWh) असे दिसल्यानंतरच फोटो काढावा व त्यानुसार फोटोनुसर मॅन्युअली रिडिंग ॲपमध्ये नमूद करावे. सबमिट करावे. मोबाईल ॲपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडिंग थेट सबमीट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रिडिंग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.