गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. बोनससाठी शासनाने बुधवारी ४७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यापैकी १२८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी (दि.२) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यावर जमा झाला.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केली जाते. मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा केली होती. पण पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र खा. प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेला बोनस शेतकऱ्यांना मिळणारच असा विश्वास दाखविला होता. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन बोनससाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारने बोनससाठी पहिल्या टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापैकी १२८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग करण्यात आला. शनिवारी (दि.३) बोनसची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.