गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ६७८ कोटी रुपयांचे चुकारे मागील दोन महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. हीच बाब आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी थकीत चुकारे करण्यासाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप हंगामात एकूण १३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आला. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत २५५४.४५ कोटी रुपये यापैकी आतापर्यंत १८७६ कोटी ४३ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले होेते. मात्र ६७८ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले नव्हते. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवीत होते. ही बाब आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर खा. पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ एप्रिल रोजी मंत्रालयात भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. तसेच शेतकऱ्यांची होणारी कोंडी आणि अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर शासनाने याची दखल घेत आदिवासी विकास महामंडळाला १९७ कोटी व मार्केटिंग फेडरेशनला ४८१ कोटी असे एकूण ६७८ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना धानाच्या चुकाऱ्यांची थकीत रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबणार असल्याने शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहेत.
...............
बोनसची रक्कम १५ दिवसात मिळणार
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा शासनाने केली होती. यानंतर जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी यासाठी प्राप्त ठरले असून बोनसची रक्कमसुध्दा १५ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यासंदर्भात सुध्दा खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा सुरु आहे.