लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा सुरूवातीपासूनच या दोन्ही केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर आत्तापर्यंत सहा क्विंटल धान खरेदी झाली असून या हंगामात १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता असून मागील १८ वर्षांचा रेकार्ड मोडला जाण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे ५७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४३ असे एकूण १०० खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. १५ डिसेंबरपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ५७ केंद्रावरुन एकूण ६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी संपूर्ण खरीप हंगामात ६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. तर यंदा केंद्र सुरू झाल्यानंतर महिनाभरातच ६ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनतर्फे मार्च महिन्यापर्यंत धान खरेदी केली जाते. तर अद्याप जिल्ह्यातील ६० टक्के शेतकऱ्यांची धानाची मळणी होणे शिल्लक आहे. त्यामुळे यंदा १५ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होण्याची शक्यता आहे. मागील १७ वर्षांत सर्वाधिक धान खरेदी २०१५-१६ मध्ये १२ लाख १९ हजार क्विंटल करण्यात होती. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक खरेदी असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यंदा हा रेकार्ड सुध्दा मोडण्याची शक्यता आहे.
धानाची उचल न झाल्यास गोदामांची समस्याजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धानाची उचल राईसमिल संचालकाकडून भरडाईसाठी केली जाते. नुकताच यासाठी जिल्हा प्रशासनाने १५३ राईसमिल संचालकांशी करार केला आहे. मात्र धानाची उचल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर झाल्यास धान ठेवण्याची समस्या निर्माण होणार नाही. मात्र उशीर झाल्यास गोदामांची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.