दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे : विशेष तिकीट तपासणी अभियान गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर-गोंदिया-राजनांदगाव या स्थानकादरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये व स्थानकांमध्ये विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास व माल बुक न करताच लगेज नेणे या प्रकारातून केवळ १३ दिवसांत रेल्वेने ११ लाख २४ हजार ४५५ रूपयांचे दंड वसूल केले. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळातील नागपूर-गोंदिया-राजनांदगाव लोकमार्गावरून धावणाऱ्या एकूण १९२ प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. सदर अभियान १ ते १३ मार्चपर्यंत १३ दिवस घेण्यात आले. १३ दिवसपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध विशेष तिकीट तपासणी अभियानांतर्गत विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच माल बुक न करता लगेजचे एकूण चार हजार ७७३ प्रकरणे नोंदविण्यात आले. यात ११ लाख २४ हजार ४५५ रूपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय केरकचरा पसरविणाऱ्यांचे ५७ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडाच्या स्वरूपात पाच हजार ५५० रूपयांची वसुली करण्यात आली. (प्रतिनिधी)
१३ दिवसांत ११.३४ लाखांची वसुली
By admin | Published: March 17, 2017 1:29 AM