काऊंटडाऊन सुरू : ४० दिवसांत होणार का ६.८२ कोटींची करवसुली? गोंदिया : करवसुलीच्या मुख्य काळाला आता सुरूवात झाली आहे. ३१ मार्चपूर्वी अर्थात येत्या ४० दिवसांत गोंदिया नगर परिषदेच्या कर वसुली विभागापुढे तब्बल ६ कोटी ८२ लाख रूपयांचा कर वसुलीचे टार्गेट आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दरदिवशी १७ लाख ५ हजार रुपयांची करवसुली करावी लागणार आहे. आता नवीन पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर करवसुलीसाठी कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी नगर परिषद कर वसुलीत ४३ टक्क्यांवरच अडकली होती. यंदा मात्र करवसुली विभाग अद्याप तरी कमकुवत दिसून येत आहे. यंदा नगर परिषदेला सहा कोटी ८२ लाख रूपयांचे टार्गेट असून नोटा बंदीत कर भरणा झाल्याने कर विभागाला चांगलेच सोयीचे झाले. मात्र त्यानंतरही नगर परिषदेला साडे सहा कोटींचे डोंगर सर करावयाचे आहे. त्यात आता शासनाने १०० टक्के कर वसुलीचे आदेश दिल्याने नगर परिषद त्यात आता कितपत यशस्वी ठरते हे सुद्धा दिसून येणार आहे. यंदा एकतर कर वसुलीची मोहिम उशिरा सुरू झाली. त्यात निवडणुकीचे काम आल्याने कर वसुली कर्मचाऱ्यांची फजीती झाली व त्याचा परिणाम कर वसुली मोहिमेवरही पडला. शंभर टक्के कर वसुली तर शक्य नाहीच मात्र ५० टक्के कर वसुलीही विभागाला जड जात असल्याचे दिसून येत आहे. आता कर वसुलीच्या या कामाला ४० दिवसांचा काळ उरला असून सहा कोटी ८२ लाख रूपयांचे टार्गेट सर करता येते काय हे बघायचे आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात २१ लाख ४७ हजार रूपयांची कर वसुली झाल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
दररोज करावी लागणार १७ लाखांची वसुली
By admin | Published: February 22, 2017 12:15 AM