नरेश रहिलेगोंदिया: अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी पिडीत पोलीस ठाण्यात आली. परंतु तक्रारकर्तीलाच धमकावून तिच्याकडून २५ हजार व आरोपीकडून १ लाख रूपये घेणाऱ्या पोलीस शिपायासह एपीआयला २२ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांनी केली आहे.
सुमेध खोपीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई प्रविण रहिले बक्कल नंबर ९८६ अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. ते दोघेही रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत हाेते.
कुडवा येथील १५ वर्षाची मुलगी ९ फेब्रुवारी रोजी गोंदियाच्या रामनगर पोलिसात तक्रार करायला गेली. परंतु तिलाच धमकावून तिच्या नातेवाईकांकडून २५ हजार रूपये घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणात ज्या तरूणावर आरोपी होता तो प्रशिक भारतलाल लांजेवार (२३) रा. बनाथर याला बोलावून त्याच्या जवळूनही १ लाख रूपये घेतले. पोस्कोची तक्रार आली हे ठाणेदाराला कळू दिले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर याने पोलीस शिपाई प्रविण रहिले याच्या मदतीने पिडीतेकडून आणि आरोपीकडून पैसे घेतले. या संदर्भात ठाणेदार यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्याकडे केली. त्या तक्रारीवरून पोलिस अधिक्षकांनी २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित केले.
पिडीतेला मदत करणाऱ्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी१५ वर्षाच्या पिडीतेचा मानलेला भाऊ तिला तक्रार करण्यासाठी मदत करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्याला घाबरवून त्याच्या जवळून २५ हजार रूपये घेतले. पैसे घेण्याचा व्यवहार रामनगर पोलीस ठाण्याच्या कॉर्नरवर असलेल्या चहा-पान दुकानावर करण्यात आला.
पोलिसांच्या पुढाकाराने केला गुन्हा दाखलसहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर याने त्या पिडीतेला धमकाविल्याामुळे ती मुलगी घरी गेली. तक्रार करायला पुढे येत नव्हती. परंतु ठाणेदाराच्या लक्षात ही गंभीर बाब आल्याने त्यांनी तिला बोलावून विश्वासात घेतले. महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती नेहे यांच्या हस्ते तिला बाल कल्याण समिती गोंदिया यांच्या समोरक्ष हजर केले. त्यांनी अल्पवयीन पिडीत मुलगी हिचे बयान नोंदवून तिने सांगितलेप्रमाणे तिची आई हिच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१),७५ (२), ३५१ (२), सहकलम ४, ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये आरोपी प्रशिक भारतलाल लांजेवार (२३) रा.बनाथर ता.जि. गोंदिया याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
"प्रकरणाची गांभीर्यता बघता प्रकरणात वेळीस दखल घेणे गरजेचे होते. परंतु प्रकरणाची दखल न घेता व पोक्सोचा गुन्हा नोंद न करता तीन दिवस वरिष्ठांपासून दडवून ठेवले. पोक्सोच्या प्रकरणाची गांभीर्यता बघता प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे तसेच कर्तव्यास अधिन राहून प्रकरण वरिष्ठांचे अवलोकनार्थ सादर करणे आवश्यक होते. परंतु यात कसूरी केल्यामुळे २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित करण्यात आले."-गोरख भामरे, पोलीस अधुक्षक गोंदिया.