गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवास : विदर्भ एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक दंडगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया प्रवासादरम्यान मासिक पासधारक प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. याचा त्रास अप-डाऊन करणाऱ्या सर्व प्रवाशांना होत आहे. आरक्षित बोगींमध्ये या पासधारक प्रवाशांना सूट देण्याची मागणी जोर धरत आहे.नागपूर-गोंदिया-नागपूर लोहमार्गावर मोठ्या प्रमाणात मासिक पासधारक प्रवास करतात. यात अनेक शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिकतर मासिक पासधारक डाऊन मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस, पॅसेंजर व विदर्भ एक्सप्रेसने तर अप मार्गावर अहमदाबाद एक्सप्रेस, पॅसेंजर, छत्तीसगड एक्सप्रेस व इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करतात. या मासिक पासधारकांच्या प्रवासासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने काही नियम घालून दिले आहेत. मात्र या सर्वच नियमांचे तंतोतंत पालन करणे पासधारकांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची मागील अनेक दिवसांपासून गोंदिया-ते नागपूर व नागपूर ते गोंदिया धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची सहमती द्यावी, खास करून विदर्भ एक्सप्रेसमधील आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.सर्वसाधारण बोगींमध्ये खूप गर्दी असते. कधी पाय ठेवायलासुद्धा जात राहात नाही. त्यामुळे मासिक पासधारक प्रवासी आरक्षित बोगींमधून प्रवास करतात. जर एखाद्या गाडीत केवळ जनरल किंवा अनारक्षित बोगीतून प्रवास करणे बंधनकारक असेल व अशावेळी मासिक पासधारक प्रवासी आरक्षित बोगीत आढळला तर रेल्वेचे कर्मचारी त्याच्याकडून चांगलाच दंड वसूल करतात. दंड न भरल्यास त्याला कार्यालयात नेवून तीन-तीन तास बसवून ठेवले जाते. त्यामुळे त्या प्रवाशांची कार्यालयीन वेळसुद्धा निघून जाते. दर महिन्यात अनेकदा विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांकडून दंड वसूल केला जातो. कधी हा दंड विनापावतीचासुद्धा असतो. अप-डाऊन करणाऱ्या आठ-दहा लोकांच्या समुहाकडून कधी प्रत्येकी ५० किंवा प्रत्येकी १०० रूपये घेवून सोडले जाते. तर कधी एकाच प्रवाशाकडून ४०० रूपयांचा दंड वसूल केला जातो. यात जायस्वाल नामक रेल्वे अधिकारी दंड वसुलीबाबत अतिशय उद्दामपणे वागून प्रवाशांना त्रास देत असल्याचे अप-डाऊन करणाऱ्या मासिक पासधारकांनी सांगितले. या प्रकारामुळे अप-डाऊन करणारे मासिक पासधारक कंटाळून गेले आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे लक्ष देवून विदर्भ एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस व इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आरक्षित बोगीत प्रवास करण्याची मुभा द्यावी किंवा मासिक पासधारकांसाठी वेगळ्या बोगीची सोय करावी व समस्या सोडवावी अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)पासधारकांसाठी मुभा असलेले डबे व गाड्यादक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदियापर्यंतच्या प्रवासासाठी मासिक पासधारकांसाठी तयार केलेले नियम असे आहेत. गाडी क्रमांक (११०४०) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूर मार्गावर बोगी क्रमांक एस/२, एस/३, एस/४, एस/५, एस/६, एस/७ यात प्रवास करण्यात मुभा आहे. गाडी क्रमांक (१२८५६) नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये नागपूर-बिलासपूर प्रवासात एस/६ व एस/७ या बोगींमध्ये व गाडी क्रमांक (११८५५) बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बिलासपूर-नागपूर प्रवासात एस/६ व एस/७ या बोगींमध्ये प्रवास करण्याची मूभा आहे.याशिवाय अतिरिक्त मासिक तिकीटधारक खालील गाड्यांच्या जनरल व अनारक्षित बोगीत प्रवास करू शकतात. यात गाडी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवासात, विदर्भ एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवासात, अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया, इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बिलासपूर-नागपूर-बिलासपूर दरम्यान जनरल किंवा अनारक्षित बोगीत प्रवास करू शकतात. सदर गाड्यांमध्ये आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची मूभा मासिक पासधारकांना देण्यात न आल्याने त्यांचा त्रास वाढला आहे. जनरल व अनारक्षित बोगीत गर्दी खूप असल्याने मासिक पासधारकांसाठी वेगळी बोगी किंवा आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची मूभा द्यावी, अशी त्यांनी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.
मासिक पासधारकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांची वसुली
By admin | Published: March 03, 2017 1:25 AM