विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. या प्रकारामुळे गोंदिया येथे नेत असताना बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाºयांच्या रेफर टू गोंदियामुळे एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.सालेकसा तालुक्याचा सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून दुर्गम आहे. या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात सर्वाधिक सर्प दंशाचा घटना घडतात. सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर योग्य औषधोपचार मिळाला तर त्याला वाचविता येऊ शकते. परंतु या तालुक्यात सर्प दंश झालेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र तिथे सुध्दा उपचाराची सोय नसल्याने या रुग्णांना बरेचदा रेफर टू गोंदिया केले जाते.परिणामी रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी सालेकसापासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या चांदसूरज गावातील एका ११ व्या वर्गात शिकणाºया विद्यार्थिनीला सायंकाळच्या वेळेत विषारी सापाने चावा घेतला. तिला आधी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसानंतर ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि त्यानंतर रेफर टू गोंदिया असा प्रवासाला तोंड देण्याची वेळ आली.अखेर तिचा वाटेतच मृत्यू झाला.प्रसुतीकरिता येणाºया महिलांना सुध्दा याच समस्येला तोंड द्यावे लागते. आई आणि बाळ सुखरुप राहावे या अपेक्षेने लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे गर्भवती महिलांना घेवून येतात. परंतु येथे आल्यावर अनेक रुग्णांना रेफर टू गोंदियाची वाट दाखविली जाते. तालुक्यात सामान्य प्रसुती करण्याची सोय आहे. त्यामुळे गर्भवती महिला रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जाते.५० कि.मी. प्रवासाचा धोकासालेकसा ते गोंदिया हे अंतर जवळपास ५० कि.मी.चे आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना उपचारासाठी ५० कि.मी.चे अंतर पार करण्याचा धोका पत्थकारावा लागतो. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी सोनपुरी येथील एका गर्भवती महिलेला तेथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी भर्ती करण्यात आले. त्या ठिकाणी सामान्य प्रसुतीची वाट बघता बघता पाच तास लोटले. तेव्हा आरोग्य सेविकेने सदर महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात दोन तास ठेवून त्या महिलेला गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु गोंदिया पोहोचण्यापूर्वीच ती महिला आणि तिचे बाळ दगावले.जर ग्रामीण रुग्णालयात सीजर शस्त्रक्रियेची सोय असती तर तिची प्रसुती सुरक्षित झाली असती.
‘रेफर टू गोंदिया’मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 9:59 PM
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते.
ठळक मुद्देवेळेवर उपचार मिळण्याचा अभाव : आरोग्य विभागाचा कानाडोळा