गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे याची माहिती आपल्याला नसते. रिफाईंड तेलाच्या नावावर आपण आपल्या शरीरात रोगांची संख्या वाढवित आहोत. आता सगळीकडे रिफाईंड तेलाचाच वापर होत असल्याने या तेलाच्या वापराने चरबीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आता लोक या रिफाईंड तेलाच्या ऐवजी जुन्याच घाणा तेलाची मागणी करीत आहेत. परंतु आता घाणा बंद झाल्याने रिफाईंड तेलाशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु जीवन वाचवायचे असेल तर घाणा तेलाकडे वळावेच लागणार आहे.
.......................
रिफाईंड तेल घातक का?
- रिफाईंड तेलाला हॉटेलात किंवा घरीही पदार्थ तयार करताना वारंवार वापरले तर त्यातून कर्करोग होऊ शकतो.
- प्रोसेस करून फॅक्टरीतून आलेल्या तेलात तेल तयार करताना वापरण्यात येणारे दाणे चांगल्या दर्जाचे असतीलच असे नाही. निकृष्ट दर्जाच्या बिया किंवा दाणे वापरून तेल काढले जाते.
- रिफाईंड तेलामुळे आपण आपल्या शरीरात हळूहळू विष घेत आहोत ‘ स्लो पाॅयझन’ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
......................
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
रिफाईंड तेलाचा अतिवापर, त्यातच काही लोक जेवणात पोळीवर, भाकरीवर किंवा भातावरही कच्चे तेल टाकत असल्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्राॅल वाढते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आजघडीला बहुतांश लोकांच्या पोटाची चरबी वाढली आहे. त्यामुळे हृदयरोगाचेही प्रमाण वाढले.
...................
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
आता लाकडी घाण्याचे तेल जिल्ह्यात कुठेच निघत नाही. त्यामुळे रिफाईंड केलेल्या तेलाचाच वापर जिल्हावासीय करीत आहेत. लाकडी तेलाच्या घाण्याचा वापर होत नसला तरी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात जवस लावून त्या जवसाचे तेल वर्षातून २-४ महिने पुरेल अशा पध्दतीने नियोजन करतात. काही शेतकरी वर्षभरही तेल वापरू यासाठी जवस जास्तीत जास्त शेतात लावण्याचा प्रयत्न करतात.
................
आहार तज्ज्ञ काय म्हणतात?
प्रोसेस करून तयार करण्यात आलेले रिफाईंड तेल शरीरात कोलेस्ट्राॅल वाढविते. ते शरीराला हळू-हळू विषारी ठरते. यामुळे शरीरातील चरबी वाढून हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. दोन प्रकारचे तेल एकाच कढईत गरम केल्यास त्या तेलात आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे असे करू नये.
- स्वाती बन्सोड, आहार तज्ज्ञ, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया.