सालेकसा : सतत कोरोनाचे संक्रमण कायम असल्याने मागील दोन वर्षांपासून सामान्य पालक वर्गाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालकांनी १० वी व १२ वी बोर्डाचे शुल्क दिले. परंतु प्रत्यक्षात बोर्डाची परीक्षा झालीच नाही. अशात परीक्षा मंडळाला परीक्षा घेण्याचा खर्च आला नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत अर्ज केलेल्या १० वी व १२ वीच्या २०२०-२१ सत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी गोंदिया जिल्हा भाजप शिक्षक सेलतर्फे करण्यात आली.
शिक्षक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना निवेदन दिले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण पारधी, संयोजक लीलेश्वर बोरकर, लक्ष्मण आंधळे, चरणदास डहारे, मनोज येेळे, सतीश मंत्री, मधुकर कुरसुंगे, सनत मुरकुटे, दुधराम राऊत, सुरेश परशुरामकर, बी. पी. बिसेन उपस्थित होते.