५० शेतकऱ्यांचा सहभाग : विविध पिकांची माहिती बोंडगावदेवी : बोळदे/करडगाव येथील शेतकऱ्याना विविध पिकांबद्दल माहिती, उत्पादन घेण्याची पध्दत अवगत होण्यासाठी जवळच्या तालुक्यातील शेतामधील पीके पाहण्यासाठी ५० शेतकऱ्यांनी क्षेत्रीय भेट घेण्याचा उपक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला. कोरडवाहू क्षेत्र विकास सन २०१५-१६ अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने शेतकरी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. बोळदे/करडगाव येथील शेतकऱ्यांचा यात समावेश होता. मंडळ कृषी अधिकारी भेटीकरीता जाणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी दरम्यान सौंदड येथील शेतकरी चोपराम कापगते यांच्या दीड एकर क्षेत्रामधील अभिलाषा जातीचे टमाटर, कुंदन, नामधारी ९१० जातीचे खरबूज, आॅगस्टा जातीचे टरबूज, रोहन जातीची काकडी, सुनिती व गुंडू जातीची मिरची दाखविण्यात आली.सिंदीपार येथील ओमप्रकाश लंजे यांच्या शेतामधील माहीम जातीचे आले, जी-१ व व्हीएनआर ८८९ जातीचा काशी कोहळा, मुंडीपार येथील चंद्रशेखर लंजे यांच्या शेतामधील जी-९ जातीची केळ, अपर बोर आदि पिकाची लागवड पध्दतीचे अवलोकन शेतकऱ्यांनी केले. क्षेत्रीय भेटीदरम्यान सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी लागवडीचे अंतर, बेणे प्रमाण, बेणे प्रक्रिया, खते, कीड, रोग, विक्री व्यवस्थापन याबद्दलची पुरेपूर माहिती त्या शेतकऱ्यांकडून अभ्यास दौऱ्याप्रसंगी घेण्यात आली. आधुनिक पध्दतीने कमी जागेमध्ये भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी चोपराम कापगते, ओमप्रकाश लंजे, चंद्रशेखर लंजे यांनी शेतकऱ्यांनी बागायती पिकांपासून भरघोष उत्पादन घेण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा असे शेतकरी समूहाला सांगितले. क्षेत्रीय भेटीचे आयोजन कृषी सहायक अविनाश हुकरे यांनी केले होते. क्षेत्र भेटीत घेतलेल्या ज्ञानातून आपली शेती पिकवू असे शेतकऱ्यांनी ठरविले.(वार्ताहर)
शेतकऱ्यांची क्षेत्रीय भेट
By admin | Published: February 29, 2016 1:24 AM