गोंदिया : सर्व अशंकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण व संशोधन तांत्रिक व अतांत्रिक तृतीय वर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी (दि.१५) काळा फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
राज्य कर्मचाऱ्यांच्या कित्येक मागण्या प्रलंबित असून त्यांच्याकडे राज्य शासनाचे लक्ष नाही. यामुळे राज्य कर्मचारी अस्वस्थ आहे. करिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र मध्यवर्ती संघटनेने घेतला होता. त्यानुसार, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण व संशोधन तांत्रिक व अतांत्रिक तृतीय वर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी (दि.१५) काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी ईश्वर डफरे, राजेश सी, राजेश रायपुरे, तेजराम खोब्रागडे, सतीश सूर्यवंशी, उमेश कावरे, योगेश बघे, दिलीप दगडकर, नीलेश पाठक, नितीन साखरकर, सचिन सलोडकर, वाघमारे, रोहन राऊत, सोमनाथ माटे, समीर कुमरे, अविनाश कन्हेरे, संदीप सोळंके, चहांदे उपस्थित होते.
-----------------------
या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण त्वरित पूर्ण करा, पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा व अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यासंदर्भात शासनाने गठीत केलेल्या समितीच्या कामकाजास सुरुवात करा, सेवा क्षेत्राचे मजबुतीकरण करण्यासाठी पुरेसे कायमस्वरूपी मनुष्यबळ निर्माण करा, सर्व रिक्तपदे त्वरित भरा, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्या, सर्व अंशकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, केंद्राप्रमाणे रोखलेले वेतन व भत्ते तत्काळ अदा करा, जीएसटीचा राज्याचा थकीत वाटा संबंधित राज्याला तत्काळ अदा करा, बक्षी समिती अहवालाचा दुसरा खंड प्रसिद्ध करा व केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते द्या या मागण्या रेटून धरल्या.