अंकुश गुंडावार
गोंदिया: संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रातही थैमान घातलेल्या लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतांनाच या आजाराने आता पुन्हा हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. चिखली येथील एका शेतकऱ्याचे लंपी आजाराने एका महिन्यात तीन जनावरे दगावली असून अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला. मोठया प्रमाणावर जनावरे दगावली. लंपी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच ग्रामीण भागात या आजाराने पुन्हा डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचे अर्थकारण जनावरांवर अवलंबून आहे. लंपी आजार झपाट्याने पसरत असून जनावरे दगावण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
दवाखाना आहे पण डॉक्टर नाही
सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे सर्व सोयी सुविधा युक्त जिल्ह्यातील सर्वात मोठे पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून या ठिकाणी पशू वैद्यकीय अधिकारी नाही. एका सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दहा बारा गावाची जबाबदारी असल्याने जनावरांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या ठिकाणाची जवाबदारी प्रभारीच्या खांद्यावर असून त्वरित पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
सर्वेक्षण व लसीकरणाची गरज
ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीस उपयोगी व जोड धंदा म्हणून या भागात दूध, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणावर पाळली जातात. लंपी आजार हा साथ रोग असल्याने अन्य जनावरांना याची लागण होवू नये, चिखली आणि परिसर नवेगाव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन वनक्षेत्रालगत बफर क्षेत्रात असल्याने पाळीव जनावराबरोबरच वन्य जीवांनाही लंपी आजाराची लागण होवू नये म्हणून प्रत्यक्ष सर्वे करुन पाळीव जनावरांचे लसीकरण व अन्य उपाय योजना तातडीने करण्याची गरज आहे.
खाजगी पशू चिकीत्सकांकडून उपचारजनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे असे लक्षात आल्यावर पशू वैद्यकीय दवाखान्यात येवून जातात मात्र डॉक्टरच वेळेवर उपस्थित राहत नसल्याने खाजगी पशू चिकीत्सकांकडून उपचार करवून घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांमध्ये माहितीचा अभाव
लंपी आजाराने जनावरे मृत्युमुखी पडल्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र नुकसान भरपाई मिळते या योजनेपासून शेतकरीच अनभिज्ञ असून शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यात उपचारच होत नसल्याने लंपी आजाराने जनावरे मृत्युमुखी पडली हे कोणत्या आधारावर नुकसान भरपाईसाठी अर्ज करणार असा सवालही शेतकरी करीत आहे. पशूवैद्यकीय अधिकारी व पुरेसा औषध साठा उपलब्ध करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.