केशोरी : दुसऱ्या लाटेतील वाढलेल्या कोरोना विषाणू महामारीच्या प्रादुर्भावामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुका प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केले होते. यामुळे अनेक व्यावसायीकांचे व्यवसाय डबघाईस आले होता. काही व्यावसायीकांचे आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. आता तब्बल दोन महिन्यानंतर सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शासनाने परवानगी दिल्यामुळे अनेक व्यावसायीकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यासह केशोरी परिसरातील अनेक गावामध्ये कोरोना विषाणूचा विस्फोट झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने एप्रिल मे या दोन महिन्यात लॉकडाऊन घोषीत करुन आवागमनासाठी कडक प्रतिबंध केले होते. लहान मोठी सर्व व्यवसाय दोन महिने बंद असल्याने दुकानावर बँकेकडून घेतलेला कर्ज हप्ते, दुकानाचे भाडे फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दुकानात कामाला असलेली कामगारांच्या हाताला कामे नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शासनाने १ जूनपासून निर्बंध शिथिल करुन तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवारपासून दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी दिल्याने दुकान मालकांबरोबर व्यवसायावर अवलंबून असलेली कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. शासनाने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून दुकाने निर्धारित केलेल्या वेळेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश प्राप्त झाली आहेत. यामुळे मात्र गावातील चहल पहल वाढल्याने दिसून येत आहे.