गोंदिया : मागील दोन दिवसांपासून रब्बीच्या शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली आहे. धान खरेदी केंद्रांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जवळपास बहुतेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी (दि. २३) गोंदिया तालुक्यातील रावणवाडी, पांजरा येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कुंदन कटारे, सरपंच वासनिक, यशवंत गेडाम, गणेश बरडे, विजय रहांगडाले, पृथ्वीराज रहांगडाले, लखन हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, उपसरपंच पन्नालाल हरिणखेडे, ओमकार नागपुरे उपस्थित होते. या केंद्रावर रावणवाडी, मुरपार, चारगाव येथील शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येणार आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आता कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागणार नाही. हमीभावाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शासकीय धान खरेदीला सुरुवात केली आहे. जवळपास बहुतेक भागात धान खरेदी केंद्र सुरू होत असल्याने शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. जिल्ह्यातील सर्वच भागातील शासकीय धान खरेदी केंद्र सुरू व्हावीत, यासाठी माजी आ. राजेंद्र जैन हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.