गोंदिया : मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया शहर आणि तालुक्यात आहेत. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन अभावी जिल्ह्यात काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा साठा वाढविण्यात यावा अशी मागणी माजी. आ. गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, माजी आ.गोपालदास अग्रवाल, आ. परिणय फुके उपस्थित होते. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करीत जिल्ह्याला दररोज दहा टन ऑक्सिजन उपलब्ध होण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच काहीजण आपण ऑक्सिजन आणण्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निर्देशावरुन जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. गोंदिया तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रजेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरु करण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली. यावर जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी लवकरच कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत अनेक रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी दिले. आ. परिणय फुके यांनी सुध्दा यावेळी शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन त्या त्वरित दूर करण्याची मागणी केली.
............
आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट त्वरित मिळावे
मागील आठवडाभरापासून कोरोना चाचणी करणाऱ्यांना अहवाल मिळण्यास आठ आठ दिवस विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच यामुळे कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट २४ तासांच्या आत उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली.