गोंदिया : लसीकरणाला सध्या शहरासह ग्रामीण भागातही वेग आला आहे. यात शहरातील प्रत्येकांकडेच आज स्मार्ट मोबाईल असल्याने ते लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्याकडे डाऊनलोड करून घेतात. तसेच त्याचे प्रिंटआऊट काढून दुसऱ्या डोससाठी आपल्याजवळ जपून ठेवत आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रत्येकच नागरिकांकडे आताही स्मार्ट मोबाईल नाही. शिवाय प्रत्येकाकडे मोबाईल नाही. अशात ते अन्य कुणाचा मोबाईल नंबर देऊन रजिस्ट्रेशन करवून घेतात. मात्र दुसरा डोस घेताना त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्याने डोस कसा घ्यायचा असा प्रश्न पडतो. मात्र अशात नागरिकांनी गोंधळून न जाता न चुकता वेळेवर लस घ्यावी. प्रमाणपत्र नसल्यास संबंधित व्यक्तीने फक्त मोबाईल नंबर कुणाचा दिला हे आठवणीत ठेवणे गरजेचे आहे. त्यावरून केंद्रावर त्यांचे प्रमाणपत्र काढून घेता येते. विशेष म्हणजे, मोबाईल नंबर आठवत नसल्यास केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे रजिस्टरमध्ये प्रत्येकाच्या नावाची नोंद आहेच. अशात त्या रजिस्टरमधून त्या व्यक्तीचे नाव शोधता येते व त्यावरून दुसरा डोस देता येईल. नागरिकांच्या सुविधेसाठी या सुविधा असून नागरिकांनी न चुकता लस घेणे गरजेचे आहे.
------------------------------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण - ४१८८१८
- पहिला डोस- ३२९३४३
- दुसरा डोस - ८९४७५
------------------------
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास
ग्रामीण भागातील प्रत्येकांकडे आताही स्मार्ट मोबाईल नाही तर कित्येकांकडे साधा मोबाईलही नाही. अशात त्यांनी कुटुंबातील, नात्यातील किंवा शेजारच्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. मात्र दुसरा डोस घेताना त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्याने अडचण येत आहे. मात्र असे झाल्यास मोबाईल नंबर लक्षात असू द्यावा. त्यानंतरही लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे रजिस्टरमध्ये नोंद असते व त्यावरूनही नाव शोधता येते.
------------------------------------
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
- लसीचा पहिला डोस घेताना रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी मोबाईल नंबर द्यावा लागतो व त्यावर आलेल्या मेसेजवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करता येते. यामुळे मोबाईल नंबर आपलाच द्यावा. स्मार्टफोन नसल्यास आपल्या कुटुंबातील व किंवा जवळील व्यक्तीचा नंबर द्यावा.
- डोस घेतल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. स्मार्टफोन नसल्यास संबंधिताकडून प्रमाणपत्राची हार्डकॉपी काढून आपल्याजवळ जपून ठेवावी.
- दुसरा डोस घेताना मोबाईलमधील प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्राची हॉर्डकॉपी न्यावी. हे नसल्यास मोबाईल नंबर कुणाचा दिला होता हे लक्षात ठेवावे.
--------------------------
मोबाईल नंबर महत्त्वाचा
ग्रामीण भागात सध्या पहिला डोस घेताना कित्येकांनी कुणाचा नंबर दिला हे त्यांनाच आता आठवत नसल्याने दुसऱा डोस घेताना त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. अशात मोबाईल नंबरवरूनच पूर्ण माहिती काढता येत असल्याने पहिला डोस घेताना रजिस्ट्रेशनसाठी कुणाचा नंबर दिला हे आठवण ठेवणे गरजेचे आहे.
-----------------------
कोट
नागरिकांनी पहिला डोस घेताना आपलाच मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी द्यावा किंवा जवळील व्यक्तीचा नंबर द्यावा. असे नसल्यास केंद्रांवर रजिस्टरमध्ये नोंद असते व त्यावरून माहिती काढता येेते. मात्र नागरिकांनी प्रमाणपत्र नसल्यास संकोच न करता वेळेवर लसीकरण करवून घ्यावे.
- डॉ. भूमेश पटले
लसीकरण मोहीम प्रमुख, गोंदिया.