गोंदिया : मागील वर्षभरापासून महिलेच्या पोटात स्वादुपिंड (पॅनक्रीयाश) ग्रंथीचा कर्करोगाचा गोळा सतत वाढत होता. अशातच गर्भधारणा झालेल्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. काही डॉक्टरांनी तिला गर्भपात केल्यानंतर शस्त्रक्रिया करू असा सल्ला दिला होता. परंतु गर्भपात न करताच तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करून एका गर्भवती महिलेच्या पोटातून १० बाय १२ सेमीचा स्वादुपिंडाचा कर्करोगाचा गोळा गोंदियातील डॉक्टर नोव्हील ब्राम्हणकर व त्यांच्या चमूने काढला.
तिरोडा येथील रशीला दिनेश मेश्राम (२३) या महिलेच्या पोटात मागील एका वर्षापासून कर्करोगाचा गोळा होता. त्या गोळ्याची वाढ मागील तीन महिन्यापासून झपाट्याने होत होती. ती १४ आठवड्याची गर्भवती असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करायची कशी हा पेच डॉक्टरांसामेर होता. काही डॉक्टरांनी आधी तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. परंतु पोटातील बाळ जीवंत राहावे यासाठीअआटापीटा करीत ती डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी नागपूर पर्यंत पोहचली. नागपूरातील डॉक्टरांनी दीड लाख रूपयाचा खर्च सांगितला होता. परंतु परिस्थती हलाकीची असल्याने त्या उपचार न करताच गावाला परतल्या. अखेर त्यांनी गोंदियातील डॉ. नोव्हील ब्राम्हणकर यांचा सल्ला घेतला. १६ जुलै रोजी तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करून स्वादुपिंडाचा गोळा काढण्यात आला. तिच्या पोटातील बाळ सुरक्षित असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. या शस्त्रक्रयेसाठी डॉ. नोव्हील ब्राम्हणकर, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. धवल सावंत, भूलतज्ज्ञ डॉ. कृणाल बोरकर यांनी केली. या शस्त्रक्रियेसाठी लोकेश नागपुरे, सेवक बंते, आनंदा कल्याणी यांनी सहकार्य केले. या पूर्वीचे तिला एक अपत्य आहे. महात्मा जोतिबा फुले योजनेतून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. नोव्हील ब्राम्हणकर यांनी सांगितले.