देखभाल दुरूस्तीचा ७ गावात्ांील प्रकार : उपअभियंता मानकर यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागात कार्यरत मानकर यांनी नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीच्या नावावर कंत्राटदारांशी संगणमत करून सात गावातील एक लाख ६६ हजार ५३२ रूपयाचे बोगस बिल लावून पैश्याची उचल करण्यात आल्याची तक्रार मुख्यमंत्र्याच्या नावे आपले सरकार या अॅपवर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागात कार्यरत असलेले उपअभियंता मानकर यांनी केलेल्या बोगस बिल प्रकरणाची तक्रार गोंदिया तालुक्याच्या इर्री येथील भाऊलाल तरोणे यांनी केली आहे. ग्राम पंचायत सातगाव व तेढा येथे सन २०१५ या वर्षी विद्युतपंप काढून हातपंप बसविण्यात आले. सद्यास्थितीत हातपंपाचे पाणी वापरणे सुरू आहे. तरी देखील या ठिकाणचे विद्युत पंप दुरूस्तीचे देयके सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात दोन वेळा काढण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षाचे सातगावचे २३ हजार ९८० रूपये तर तेढाचे २५ हजार ९३ रूपये काढण्यात आले आहेत. गांधीटोला, तिरखेडी, दरबडा, साखरीटोला व बोटे या गावात योजना सुरळीत सुरू आहे. कोणताही बिघाड नाही. तरी देखील २०१६-१७ या वर्षात देखभाल दुरूस्ती व टी.एस.पी. या योजनेतून देयके काढण्यात आली आहेत. गांधीटोला या गावातून २३ हजार ९८० रूपये, दरबडा येथील २४ हजार २७८ रूपये, साखरीटोला येथील २३ हजार ५६८ रूपये, तिरखेडी येथील २४ हजार १२७ रूपयाचे बोगस बिल काढण्यात आले आहेत. आमगाव तालुक्याच्या बोदा गावात कोणतीही लघु नळ पाणी पुरवठा योजना सुरू नाही. तरीही या गावचे विद्युतपंप देयके सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आले. २२ हजार ९६ रूपयाचे बूल काढण्यात आले आहेत. उपअभियंता मानकर यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार खा. नाना पटोले यांनीही विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाऊलाल तरोणे यांनी केली आहे.
काम न करताच १.६६ लाख काढले
By admin | Published: May 21, 2017 1:41 AM