मागेल त्याला तत्काळ जोडणी : एमएसईबी पोहचली थाटेझरीतकपिल केकत ल्ल गोंदिया घरात वीज मीटर घेणे हा विचार करणे कठीण असलेल्या १० परिवारांना वीज वितरण कंपनीने तत्काळ जोडणी देऊन त्यांच्या घरातील अंधार दूर केला. वीज वितरण कंपनीच्या ‘मागेल त्याला तात्काळ जोडणी’ या उपक्रमांतर्गत सडक-अर्जुनी उप विभागाने नक्षलग्रस्त व दुर्गम अशा थाटेझरी या गावात ही कामगिरी करून दाखविली आहे. विशेष म्हणजे उर्वरीत काही परिवारांनाही लवकरच जोडणी देऊन विभागाकडून अवघे गावच प्रकाशमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी ग्रामपंचात अंतर्गत येत असलेले थाटेझरी हे गाव कोसमतोंडीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. नागझिरा अभयारण्यात येत असलेले हे गाव नक्षलग्रस्त व दुर्गम असून ८६ घरांची लोकवस्ती आहे. शेती व मजूरी करणारे येथील गावकरी आहेत. या गावातील ७० घरांना वीज जोडणी होती तर उर्वरीत घरांत मात्र अंधार राहत होता. जंगलात त्यांना अशाच स्थितीत आपले दिवस काढावे लागत होते. अशात महावितरणच्या सडक-अर्जुनी उप विभागीय कार्यालयाने टोकावर असलेल्या गावांची पाहणी केली असता त्यांना थाटेझरी हे गाव नजरेस आले व त्यांनी या गावची निवड करून ‘मागेल त्याला तात्काळ जोडणी’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी उप कार्यकारी अभियंता नावेद शेख, कनिष्ठ अभियंता राहूल पाटील व प्रणय बडोले यांनी देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांच्या परवानगीने काम सुरू केले. यासाठी त्यांनी कोसमतोंडीचे सरपंच पशिने यांना गाठून थाटेझरीबाबत जाणून घेतले. तसेच २७ सप्टेंबर रोजी गावात गाडी फिरवून लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले व त्यांना कोसमतोंडी ग्रामपंचातय कार्यालयात मार्गदर्शन केले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी थाटेझरीत कॅम्प लावला. या कॅम्पमध्ये वीज जोडणीसाठी पुढे आलेल्या १० जणांचे अर्ज भरण्यापासून संपूर्ण कारवाई करीत त्यांना त्वरीत वीज जोडणी देण्यात आली. अशाप्रकारे महावितरणने थाटेझरीवासीयांच्या घरापर्यंत जावून थाटेझरी गावात असलेल्या १० घरांतील अंधार दूर केला. ते पाळतात जंगली कुत्रे ४थाटेझरी हे गाव नागझिरा अभयारण्यात येत असून या गावात नेहमीच हिंस्त्रपशूंचा वावर असतो. या जगंली जनावरांपासून सुरक्षेसाठी थाटेझरी गावात प्रत्येकांनी जंगली कुत्रे पाळले आहेत. एखादा हिंस्त्रपशू गावात शिरल्यास हे कुत्रे एकत्र येवून त्यावर हल्ला करतात व हाकलून लावतात. सरपंचांचे लाभले विशेष सहकार्य ४वीज जोडणी देण्यासाठी अर्जासोबत संबंधीत लोकांच्या घराची कर पावती आवश्यक होती. यावेळी सरपंच पशिने यांनी त्वरीत या १० परिवारांची घर कर पावती तयार करून दिली. त्यामुळे १० लोकांचे अर्ज त्वरीत भरून व आवश्यक ते कागदपत्र जोडले. तर लाईनस्टाफ तुषार मुंगूलमारे व आशिष जांभूळकर यांनी त्यांना त्वरीत वीज जोडणी दिली. याशिवाय सरपंच पशिने यांनी थाटेझरीवासीयांना भेटून त्यांना वीज जोडणीसाठी प्रेरीत करून महावितरणला सहकार्य केले. विशेष म्हणजे ज्या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही, एसटी कधी पोहचली नाही, शासकीय योजनांचा लाभ गावाला मिळत नाही तेथे मात्र महावितरणने पुढाकार घेत गावाला प्रकाशमान करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी करून भरणार त्यांची डिमांड ४१० परिवारांना जोडणी दिल्यानंतरही या गावातील सहा परिवारांकडे अद्याप वीज जोडणी नाही. विशेष म्हणजे या सहा परिवारांची डिमांड भरण्याचीही ताकत नाही. त्यामुळे २९ तारखेच्या कॅम्पमध्ये ते जोडणीसाठी पुढे आले नाहीत. मात्र यावर तोडगा म्हणून सडक-अर्जुनी कार्यालयातील कर्मचारी आता आपसांत वर्गणीकरून या सहा परिवारांची डिमांड भरून त्यांना वीज जोडणी देणार आहेत. लवकरच हे काम केले जाणार असून थाटेझरी हे गाव पूर्णपणे प्रकाशमान केले जाणार आहे. विशेष म्हणजे असे झाल्यास थाटेझरी या गावाची वीज चोरीमुक्त गावात गणना होणार असल्याचे कनिष्ठ अभियंता राहूल पाटील यांनी सांगीतले.
दूर केला त्यांच्या घरातील अंधार
By admin | Published: October 10, 2016 12:17 AM