विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जर तुम्ही आपले घर भाड्याने देत असाल, तर त्या भाडेकरू व्यक्तीबद्दलची पूर्ण शहानिशा करूनच घर भाड्याने द्या, अन्यथा तुमच्यासोबत दगा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सध्या काही परप्रांतीय लोक सालेकसासह जिल्ह्यातील इतर तालुकास्थळी किंवा प्रमुख गावात काही दिवस आपले ठाण मांडून दुष्कृत्य करून पळून जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात परप्रांतातून आलेले अनेक लोक वेगवेगळा व्यवसाय थाटून वास्तव्यास राहतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत व शहरात ते सुध्दा राहत असून एकमेकांच्या संपर्कात असतात. काही लोकांना २-३ किंवा ६ महिने आपला एखादा व्यवसाय करून आपल्या स्वगावी त्यांच्या प्रांतात परत निघून जायचे असते. यादरम्यान ते शहरातील एखाद्या घरमालकाशी संपर्क साधून भाड्याने खोली घेतात. या कालखंडात ते घरमालक व त्यांच्या कुटुंबाबद्दल बरीच माहिती प्राप्त करून घेतात. एवढेच नाही, तर त्यांच्याकडील मालमत्ता व प्रत्येक सदस्याचे मोबाईल नंबर मिळवून घेतात. परंतु याउलट आपले घरमालक हवी तेवढी शहानिशा न करता घर किंवा खोली भाड्याने देऊन टाकतात. तो कुठून आला, कोणत्या प्रांतातील आहे, त्याचे गाव कोणते, कुुटुंबातील लोक काय करतात, इकडे कशासाठी आला... याची माहिती घेत नाहीत. काही महिने व्यवस्थित वास्तव्य करून परत जाण्याची वेळ आली की, कोणते न कोणते मोठे नुकसान करून जातात. अशात त्यांची सखोल माहिती नसल्याने त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई सुध्दा करता येत नाही. सालेकसा तालुका तीन राज्यांच्या सीमेवर असून या तालुक्याची ७० टक्के सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याशी लागली आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या परप्रांतीय लोकांचा नेहमीच मोकाट वावर असतो. असे लोक अनेक वाईट कृत्ये करून निघून जातात व त्यांचा नंतर काही थांगपत्ता लागत नाही. काही परप्रांतीय ठाण मांडून गोलगप्पे, चाट, फळे, स्वीट मार्ट, उन्हाळ्यात कुल्फीची दुकाने व इतर व्यवसाय करतात. धंद्याचा काळ संपला की घरमालकासह इतरांना दगा देऊन ते पळून जातात.महिला-मुलींवर असते वक्रदृष्टी - परप्रांतातून आलेले विशेष करून छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातून आलेले लोक मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. सोबतच महिलांच्या दागिन्यांवर सुध्दा त्यांची वक्रदृष्टी राहते व ते कसेे हस्तगत करावेत, याच्या प्रयत्नात ते असतात. शहरात वेगवेगळ्या दुकानात जसे मिठाई दुकान, ऑटो दुरुस्ती केंद्र, कापड दुकान, हार्डवेअर इत्यादी दुकानांमध्ये काम करणारे अनेक युवक परप्रांतातील असून दुकानात येणाऱ्या महिला-मुलींवर वक्रदृष्टी ठेवून त्यांची फसवणूक करण्यासाठी प्रयत्न करतात. अशी काही प्रकरणे आता समोर सुध्दा आली आहेत.
माहितीची नोंद असणे आवश्यकघरमालकाने खोली भाड्याने देताना त्या व्यक्तीची व्यक्तिगत व कौटुंबिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्या आधारकार्डची फोटोकॉपी, पासपोर्ट फोटो, शाळेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र व इतर आवश्यक माहितींचे प्रमाण गोळा करून घ्यावे व नंतरच खोली भाड्याने द्यावी. त्याचप्रमाणे दुकान मालकाने सुध्दा कोणत्याही युवकाला किंवा युवतीेला नोकरी देताना शहानिशा करणे गरजेचे आहे. अनेक वाईट घटना घडत असताना पोलिसांनी सुध्दा शहरात कोणता व्यवसाय करणारा कोण आहे, तो कोठून आला, याची माहिती गोळा केली पाहिजे किंवा घरमालकांना ही सूचना केली पाहिजे, असे कळविले आहे. असामाजिक तत्त्वांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच राज्याची सीमा ओलांडून तालुक्यात फिरत असणाऱ्या लोकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालण्याची गरज आहे.