विनिता साहू यांची माहिती : गावात शांतता नांदवा भंडारा : सन २०१६-१७ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम १५ आॅगस्ट २०१६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेवून गाव समित्या पुर्नगठीत कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी दिल्या आहेत. गावपातळीवर छोट्याछोट्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होवू नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होवू नये, कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येवू नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेवून सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करीता महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिम सुरु केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागाचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहिम ही लोकचळवळ महणून राबविली जावी मोहिमेमध्ये दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर तंटयांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहिम संपली असे नाही यापुढेही मोहिम राबविण्याचे काम सातत्याने सुरुच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील. तथापि जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामकाजात अडथडा निर्माण करीत असतील अशा सदस्यांना बदलून नविन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ आॅगस्ट नंतरच्या पहिल्या ग्राम सभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे १/३ पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येणार नाहीत. तसेच समितीच्या अध्यक्ष बदलण्याची ग्राम सभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नविन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेमध्ये करण्यात यावी. गाव समितीमध्ये महिलांना ३० टक्के प्राधान्य द्यावे. प्रत्येक गावातील अध्यक्ष व सदस्य यांनी निवड करतांना शासन निर्णयाला अधिन राहून तंटामुक्त गाव समिती अध्यक्षांची निवड पोलीस विभागाकडून वर्तणूकीचा दाखला घेवूनच करण्यात यावी. तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड ग्रामसभेच्या मान्यतेने करण्यात यावी. तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावातच मिटवित रहावे. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावभेटी व दौऱ्याचे वेळी तंटामुक्त तंटामुक्त गाव समित्यांना मार्गदर्शन करुन तंटे मिटविण्यास सहकार्य करावे. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यानी चोखपणे कार्य करीत रहावे, गाव पातळीवरील समितीमध्ये सर्व प्रकारचे सदस्यांचा समावेश असल्याने सर्वांनी कर्तव्य निट बजावल्यास मोहिमेस निश्चित गती येवू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठण करा
By admin | Published: August 01, 2016 12:08 AM