येथून अर्जुनी-मोरगावला जाणाऱ्या गावांतर्गत मुख्य रस्ता आणि केशोरी ते वडेगाव (बंध्या) तसेच केशोरी ते महागाव या तिन्ही रस्त्यांचे डांबरीकरण उखडून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून राहत असल्यामुळे हे रस्ते अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. यापूर्वी या रस्त्यांवर वाहनांचे लहान-मोठे अपघात घडले आहेत. तरीपण या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वाहनचालक या रस्त्याने वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवीत असल्याचे बोलले जाते.
वाहनचालकांच्या कमरेचे आजार वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी या भागातील उद्योगपती घनश्याम धामट यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे कार्य केले; परंतु आता टाकलेला मुरूम पावसामुळे उखडून खड्ड्यांची स्थिती जैसे थे झाली आहे. नागरिकांची सततची मागणी लक्षात घेऊन राजकीय पुढाऱ्यांनी रस्तेदुरुस्तीची अनेकदा घोषणा केली; परंतु रस्त्यांची अवस्था तीच आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्याप्त आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.