लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे विहिरीची तोंडी खचली की भुस्खलनाचा प्रकार आहे. गावातील जमीन कशी आहे. याचा शोध घेण्यासाठी भूवैज्ञानिक विभागाशी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी संपर्क साधल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. चार तासात १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या अतिवृषटीमध्येच गावातील सार्वजनिक विहिरी खचली. तोंडी खचून वरचा सिमेंटचा भाग या विहिरीत गेला. ही विहीर सुमारे ६० फूट खोल होती. विहिरीचा वरील भाग खचून विहिरीत गेला. त्यामुळे त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला. विहिरीपासून अगदी जवळच गोवारी शहीद स्मारक आहे. अगदी ५ फूट अंतरावर एक मोठे झाड व त्याला लागूनच हेमराज पांडुरंग मेश्राम यांचे घर आहे. केवळ विहिरी पूरतीच जागा नव्हे तर आजूबाजूची जागा सुद्धा खचत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुन्हा दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळ मोठा पाऊस झाला तर आजूबाजूची जागा खचून गोवारी शहीद स्मारक व मेश्राम यांच्या घराला धोका पोहोचू शकतो. ग्रामपंचायतने विहिरीकडे कुणी जाऊ नये यासाठी विहिरीच्या सभोवताल दोरखंड बांधून अडवणूक केली आहे. मात्र केवळ एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही.माहुरकुडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल हे घटनेच्या दिवशीपासूनच गावकऱ्यांच्या संर्पकात आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि.२३) त्यांनी तहसीलदार धनंजय देशमुख यांची भेट घेवून संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात काय? यावर चर्चा केली. तहसीलदारांनी यासाठी खर्च कुठून करायचा असा प्रश्न केला. त्यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायतकडेही दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता नसल्याचे सांगितले. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.भूवैैज्ञानिक विभागाला पाठविले फोटोतहसीलदार देशमुख व जि.प.सदस्य पालीवाल यांनी गुरुवारी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते. त्यांनी गावकºयांशी चर्चा केली. याच प्रकारे गावातील जमीन सुद्धा भुसभुशीत झाली आहे काय? ही बाब जाणून घेण्यासाठी भूवैज्ञानिक कार्यालयाशी त्यांनी संपर्क केला. त्यांना घटनास्थळाचे छायाचित्र पाठविले.त्वरित उपाययोजना कराजिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास संकट उद्भवण्याची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून विहिरीचा खड्डा तातडीने बुजवावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या परिसराला ताराचे कुंपण करण्याचे निर्देश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला दिले आहेत.
भूस्खलन झालेल्या विहिरीच्या डागडुजीचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 8:50 PM
तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देमालकनपूर येथील घटना : तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्याने केली पाहणी