गोंदिया : नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर येथील जेडी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या लोकेश विजय येरणे या विद्यार्थ्याला शाळा व्यवस्थापनाने पूर्ण प्रवेश शुल्क भरण्यासाठी धारेवर धरल्यामुळे त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा गोंदिया यांनी केली आहे. ओबीसी गटात एक लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा असल्यामुळे लोकेश येरणे शिष्यवृत्तीसाठी पात्र होता. परंतु त्याला १०० टक्के शुल्क भरण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने त्याच्यावर दबाव टाकला. शाळा व्यवस्थापनाच्या दबावाला कंटाळून त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येला शाळा व्यवस्थापन शिष्यवृत्ती देणारा सामाजिक न्याय विभाग जबाबदार असून ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दुर करण्याची मागणी राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात बबलू कटरे, मनोज मेंढे, अमर वऱ्हाडे, कैलाश भेलावे, खेमेंद्र कटरे, मुकुंद धुर्वे, कमल हटवार, कमल हटवार, संतोष वैद्य, वासुदेव वंजारी, चंद्रकुमार बहेकार यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
आत्महत्येप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवा
By admin | Published: February 29, 2016 1:25 AM