गोंदिया : शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. परिणामी कोरोना चाचण्यांचे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर अधिक ताण वाढला आहे. अशातच रजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नमुना तपासणी घेतला नसतानाही संबंधिताला सकारात्मक अहवाल दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील गर्रा येथील रहिवासी सचिन बोपचे या युवकाने २२ एप्रिल रोजी काका कुंजीलाल बोपचे यांना आरटीपीसीआरची तपासणी करण्यासाठी रजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. तसेच सचिनने चाचणीसाठी आपला स्वॅब दिला नव्हता. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सचिनला अहवाल सकारात्मक दाखविण्यात आले. यामुळे त्याची मानसिक स्थिती खराब झाली. या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सचिन बोपचे यांनी केली आहे.