गोंदिया: सालेकसा तालुक्यातील नाकानिंबा जंगल परिसरातून चारचाकी वाहनाने जनावरांना कत्तलखान्यात वाहून नेत असतांना १८ डिसेंबर रोजी १६ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सालेकसा पोलिसांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहन व जनावरांची किंमत ४ लाख २० हजार रूपये सांगितली जाते.
सालेकसा पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाकानिंबा गावाजवळील जंगलात अवैधरित्या चारचाकी वाहनाने जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास जंगल परिसर गाठून चारचाकी वाहन एम. एच.३१ सी.आर. ८८११ हे जप्त करण्यात आले. त्या वाहनात ६ जनावरे तर वाहनाच्या बाजुला १० मोठे जनावरे होती. जप्त करण्यात आलेल्या १६ जनावरांची किंमत १ लाख २० हजार रुपये व चारचाकी वाहनाची किंमत ३ लाख रूपये असा एकुण ४ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला.
सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात प्राणी संरक्षण कायदा कलम ५ (अ)(२), ६, ०, सहकलम ११ (१) (ड) (ई) (फ) (ह) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस नायक उईके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस शिपाई इंगळे, चालक पोलीस नायक अग्नीहोत्री यांनी केली आहे.