गोंदिया : न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळच आली नसती. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे, असा आरोप आ. डॉ. परिणय फुके यांनी केला.
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपच्यावतीने बुधवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. धरणे आंदोलनात आ. फुके पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा राज्य सरकारला पत्रे पाठविली होती. परंतु सरकार नेहमीप्रमाणे निष्क्रिय राहिल्याने राज्यात ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण रद्द झाले. जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही असे सांगून दिशाभूल केली जात आहे. या आरक्षणाची आवश्यकता का आहे, हे सिद्ध करण्याकरिता एम्पिरिकल डाटा तयार करणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. मात्र, हा डाटा तयार करण्यासाठी मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठनही सरकारने केले नाही. याच बाबीवर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवले आहे. यावरुनच राज्य सरकारला या समस्येचे गांभीर्यच कळाले नसल्याचा आरोप केला. आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आणली आहे, तर उद्या शिक्षण व नोकरीवर सुद्धा येणार आहे. हे ओबीसी विरोधातील षडयंत्र आहे. सरकारने तातडीने मागासवर्ग आयोगाची स्थापना करून आरक्षण वाचविण्यासाठी तातडीने हालचाल करुन न्याय द्यावा, अन्यथा बहुजन समाज लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा काढून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी आ. फुके यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
...................
आंदोलनाच्या सुरुवातीला वाहिली श्रध्दांजली
आंदोलनाच्या सुरुवातीला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रामुख्याने खा. सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, आ. विजय रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, लायकराम भेंडारकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष उमाकांत ढेंगे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य चामेश्वर गहाणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, न. प. सभापती जितेंद्र पंचबुद्धे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका उपस्थित होते.